Ad will apear here
Next
घुमटावर भगवा फडकला (श्रीराम मंदिर लेखमाला - ३)
शरयू नदीकाठ

‘कारसेवा’ आणि ‘रथयात्रा’ ह्या रामजन्मभूमीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत. जनतेचा सहभाग यातून दिसून येतो. रामजन्मभूमीच्या खटल्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे १ जुलै १९८९. ह्या दिवशी विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष न्या. देवकीनंदन अगरवाल यांनी दिवाणी न्यायालयात ‘रामलल्ला’च्या वतीने एक अर्ज केला. कायद्यानुसार ‘रामलल्ला’ ही विधीग्राह्य व्यक्ती असते. त्या अर्जाद्वारे विनंती करण्यात आली, की इमारत पाडून मंदिर बांधतेवेळी प्रतिवादींपासून अडथळा होऊ नये म्हणून आदेश देण्यात यावा. दुसऱ्या एका अर्जाद्वारे रामलल्लाचा जवळचा मित्र म्हणून सुयोग्य माणसास नेमावे, अशी विनंती करण्यात आली. दिवाणी न्यायाधीशांनी त्याच देवकीनंदन अगरवाल यांनाच जवळचा मित्र म्हणून घोषित केले. 

गावोगावी शिलापूजन
३० सप्टेंबर १९८९पासून ‘विहिंप’ने गावोगावी श्रीराम शिलापूजनाचे कार्यक्रम चालू केले. 

राममंदिराचा शिलान्यास
शिलान्यासाची जागा विवादास्पद आहे असे घोषित करून शिलान्यासावर बंदी आणावी, असा रिट अर्ज उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केला होता. गोरक्षपीठाधीश महंत अवेद्यनाथजी हे रामजन्मभूमी मुक्तियज्ञ समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याशी बोलणी करण्याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री बुटासिंग यांना गत्यंतरच नव्हते. नऊ नोव्हेंबर १९८९ला विरोधकांवर मात करून शिलान्यास केला गेला. तो केला गेला बिहारचे दलित रामभक्त संत कामेश्वर चौपाल यांच्या पवित्र हस्ते! हा सामाजिक न्याय, समता, ममता आणि समरसतेचा शिलान्यास होता!! 
या शुभप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचा आशीर्वादात्मक संदेश आला. ज्यांनी मंदिरासाठी बलिदान दिले त्यांचे स्मरण करीत ते म्हणाले, की ‘शिलान्यास हे शतकानुशतके चालत आलेल्या हिंदूंच्या संघर्षशीलतेचे द्योतक आहे.’ 



अडवाणींची रथयात्रा
१९८९च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन खासदारांची संख्या ४२५वरून १९२वर आली. २ डिसेंबर १९८९ रोजी भाजप आणि डाव्या पक्षांच्या मदतीने व्ही. पी. सिंगांच्या नेतृत्वाखाली जनता दलाने सरकार स्थापन केले. हरिद्वारला २३-२४ जून १९९० रोजी गंगेच्या किनाऱ्यावर संतसंमेलन झाले. मंदिर निर्माण करण्यासाठी ३० ऑक्टोबर १९९० हा दिवस ठरला. विशेष म्हणजे ह्या संमेलनात भारतीय मुस्लिम युवा संमेलनाचे अध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी ह्यांनी जाहीरपणे १०० राष्ट्रवादी मुसलमानांसह सहभागी होऊन, गरज पडल्यास सगळ्यात आधी अटक करवून घेण्याची तयारी दर्शवली. ‘ही लढाई हिंदू-मुसलमान ह्यांत नाही, तर राष्ट्रवादी आणि राष्ट्रद्रोही यांच्यात आहे,’ असेही ते म्हणाले होते. 

१ सप्टेंबर १९९० रोजी अरणी मंथनातून अग्नी निर्माण करून अयोध्या येथे ‘श्रीराम ज्योती’ प्रज्ज्वलित करण्यात आली. हिंदूंसह अनेक मुस्लिम संघटनांचा राममंदिराला पाठिंबा होता. भारतीय मुस्लिम युवा संमेलनाचे अध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी, ‘मुस्लिम फॉर प्रोग्रेस’चे अध्यक्ष अयुब सईद, मुस्लिम महिला मंडळाच्या अध्यक्षा नफिसा शेख, ‘मुसलमान-ए-हिंद’चे अध्यक्ष डॉ. साबीर शेख यांचा त्यात समावेश होता. 

रथयात्रा लोकांच्या प्रतिसादाने लोकप्रिय होत गेली. २५ सप्टेंबर १९९० रोजी गुजरातमधील सोमनाथहून रथ अयोध्येकडे निघाला. १० हजार किलोमीटरचा हा प्रवास होता. २२ ऑक्टोबर १९९० रोजी लालकृष्ण अडवाणी पाटण्याहून समस्तीपूरकडे रवाना झाले; पण त्यांना बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी सहा वाजता अटक केली. भाजपने व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. राममंदिराकडे जनतेचा रेटा वाढत होता. 

‘रक्त देंगे, प्राण देंगे, मंदिर वही बनायेंगे’
राममंदिर आंदोलन चिरडण्याच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटणे चालू होते. न्यायालयाचे हुकूम धुडकावणे तर नित्याचेच झाले होते. हिंदूंच्या वतीने न्यायालयीन लढ्यासाठी ‘विश्व हिंदू अधिवक्ता संघ’ स्थापन केला गेला. 

अयोध्येमध्ये तर जणू शत्रूचे आक्रमण होणार असे गृहीत धरून मुलायमसिंह सरकारने पोलीस बंदोबस्त केलेला होता. फैजाबादमध्ये २२ अधीक्षक, ४८ उपनिरीक्षक, १०० उपनिरीक्षक, ३०० हेडकॉन्स्टेबल, १२०० शिपाई, २८० महिला शिपाई, ५५०० होमगार्डस् तैनात होते. त्या जोरावर मुख्यमंत्री मुलायमसिंग ह्यांनी फुशारकी मारली होती, की ‘परिंदा भी पर नही मार सकेगा... ’ पण जनतेचा उत्साह अफाट होता. संघाचा कार्यकर्ता उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचला. तथाकथित दलित, मागासवर्गीय जाती, ठाकूर, राजपूत, कुर्मी, कायस्थ, ब्राह्मण हा भेदच नष्ट झाला. पोलिसांना हुलकावणी देत कारसेवक हजारोंच्या संख्येने अयोध्येत जमले. ‘कारसेवा’ हा एकच शब्द भारतभर ऐकू येत होता. 

‘Yes, we have done it! आम्ही ते घडवलेच!’
३० ऑक्टोबर १९९० रोजी नेहमीप्रमाणे सकाळ झाली. ९ वाजून १० मिनिटे झाली आणि मणिराम छावणीचा दरवाजा सताड उघडला. अशोकजी सिंघल, महंत नृत्यगोपालदास, स्वामी वामदेव, विवेकानंदजी महाराज, साक्षीजी महाराज हे सगळे वाल्मिकी रामायण भवनात आले. त्यांच्यामागे हजारो कारसेवक आले आणि घुमटावर भगवा ध्वज फडकला. इकडे हनुमान गढीजवळच अशोकजी सिंघल लाठीहल्ल्यात जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे त्यांना ‘बीबीसी’च्या पत्रकाराने भगवा ध्वज घुमटावर फडकल्याचे सांगितले. ‘आम्ही ते घडवलेच!’ असे उद्गार सिंघल ह्यांनी काढले. 

डॉ. गिरीश आफळे
‘मंदिर वही बनायेंगे’ हे आता खरोखरच वास्तवात येणार ह्याची खात्री जनतेला पटू लागली होती. भगवा ध्वज फडकवून जणू जनमानसात त्याची पायाभरणी झाली. घुमटावर भगवा ध्वज हे कायमचे एक प्रभावी प्रतीक म्हणून प्रसारमाध्यमे वापरू लागली. भगवा मनातून घुमटावर फडकला. 


- डॉ. गिरीश आफळे, पुणे
(लेखक परिचय, तसंच या लेखमालेची प्रस्तावना, वापरलेले संदर्भग्रंथ आदी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WUULCU
Similar Posts
न्यायालयीन संघर्ष (श्रीराम मंदिर लेखमाला - ६) रामजन्मभूमीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी लेखमाला - भाग सहा...
तो स्वर्णिम दिवस! (श्रीराम मंदिर लेखमाला - ७) रामजन्मभूमीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी लेखमाला - भाग सात
मंदिर वही बनायेंगे... (श्रीराम मंदिर लेखमाला - ४) रामजन्मभूमीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी लेखमाला - भाग चार...
श्रीरामांची बंदिवासातून मुक्तता (श्रीराम मंदिर लेखमाला - २) रामजन्मभूमीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी लेखमाला - भाग दोन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language